Ad will apear here
Next
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा
‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी ‘बॅक टू दी फ्युचर- भाग १, २, ३’मधली कथानायक मार्टी मॅक्फ्लायची चित्तरकथा पाहायलाच हवी... आजच्या ‘सिनेसफर’मध्ये तीच पाहू या...
..... 
शाळकरी वयात जॉर्ज गेमॉव्हच्या ‘वन, टू, थ्री...इन्फिनिटी’ पुस्तकात वाचलेली गमतीशीर कविता मनावर कोरली गेली होती, ‘देअर वॉज ए लेडी नेम्ड मिस ब्राइट, हू कुड ट्रॅव्हल मच फास्टर दॅन लाइट, शी डीपार्टेड वन डे, इन ए रिलेटिव्ह वे, अँड केम बॅक ऑन द प्रीव्हियस नाइट!’...पुढे वाचनात आलं, की मुळात ही कविता १९२३ सालची! आणि खरं तर एच. जी. वेल्सने १८९५ सालीच ‘दी टाइम मशीन’ ही विलक्षण कादंबरी लिहून टाइम ट्रॅव्हल ही संकल्पना जगासमोर आणली होती. एखाद्या मशीनच्या साह्याने आपण वर्तमानकाळातून भूत किंवा भविष्यकाळात जाऊ शकतो ही कल्पनाच प्रचंड रोमांचक आणि अद्भुत! त्यात १९८५ साली रॉबर्ट झेमेकीस आणि बॉब गेलने मिळून ‘बॅक टू दी फ्युचर’ची पटकथा तयार केली, जी स्टीव्हन स्पिलबर्गसारख्या निर्मात्याच्या पाठिंब्याने पडद्यावर आली. मायकेल जे. फॉक्स या त्या वेळच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या छोकऱ्यामुळे ‘मार्टी मॅक्फ्लाय’ हा लाघवी कथानायक मूर्तिमंत समोर उभा राहिला. ‘बॅक टू दी फ्युचर’ची कथा प्रचंड गुंतागुंतीची! आणि ती व्यवस्थित समजून एन्जॉय करण्यासाठी मस्तपैकी बैठक मारून तिन्ही भाग एकापाठोपाठ एक बघण्याचा ‘मझा’ काही औरच!!...

बॅक टू दी फ्युचर : भाग पहिला - 

स्थळ : हिल व्हॅली, कॅलिफोर्निया. काळ : ऑक्टोबर १९८५. मार्टी मॅक्फ्लाय (मायकेल जे. फॉक्स) हा ज्युनिअर कॉलेजवयातला तरुण मुलगा. त्याची मैत्रीण जेनिफर पार्कर (क्लॉडिआ वेल्स). मार्टीला गिटारवादनाची भलतीच आवड; पण कॉलेजमध्ये त्याला रिजेक्ट केलं गेलंय. मार्टीचे वडील जॉर्ज (क्रिस्पिन ग्लोव्हर) आणि आई लॉरेन (ली थॉम्प्सन)... दोघंही तसे साधे. जॉर्ज आपल्याच लहानपणीच्या मित्राबरोबर बीफ टॅननकडे (थॉमस विल्सन) काम करतात; पण कायमच त्याच्याकडून मानहानी सहन करत असतात. डॉक्टर एमेट ब्राउन (क्रिस्टोफर लॉइड) हे मार्टीचे दोस्त. हा माणूस प्रगाढ बुद्धिमत्ता असलेला सायंटिस्ट! कालप्रवास करणं शक्य आहे याविषयी त्याने तीस वर्षांपूर्वीच संशोधन केलंय आणि आपल्या कल्पनेनुसार डेलोरिअन कारचा वापर करून एक प्लुटोनियमवर चालणारा आणि प्रचंड उर्जा निर्माण करणारा फ्लक्स कपॅसिटर त्याने बनवलाय. त्याच्या साह्याने त्या काररूपी टाइम मशीनला एक विशिष्ट गती प्राप्त झाली, की आपण आत बसवलेल्या यंत्रात सेट केलेल्या तारखेनुसार कुठल्याही काळातल्या त्या तारखेमध्ये डायरेक्ट जाऊन अवतरतो. अर्थात हे थोडं पुढे कळतं...

घड्याळाच्या टिकटिकीच्या लयबद्ध तालावर, टायटल्सना सुरूवात होते. डॉक्टरच्या घरातल्या अडगळीवजा खोलीमधली एकेक रोबोटिक यंत्रं निमूटपणे आपापली कामं करताना दिसतात. बाजूला सुरू असलेल्या टीव्हीवरून न्यूज ऐकायला मिळते... कुठूनसा प्लुटोनियमचा काही साठा लिबियन बंडखोरांनी चोरल्याची. कॅमेरा त्या सर्व चित्रविचित्र यंत्रांवरून फिरताना का कुणास ठाऊक एका लाकडी बॉक्सवरून फिरतो, ज्यावर प्लुटोनियम लिहिलंय! मार्टी नेहमीप्रमाणे आपला लाडका स्केटबोर्ड घेऊन डॉकच्या त्या खोलीत चक्कर टाकायला आलाय. तिथलं इलेक्ट्रिक गिटार त्याला भलताच मोठा शॉक देतं, त्या सीनने सिनेमाची सुरुवात!... तेवढ्यात त्याला डॉकचा फोन आलाय आणि फोनवर अतिशय उत्तेजित स्वरात बोलणारे डॉक त्याला न विसरता रात्री १.१५ वाजता ट्विन पाइन्स मॉलमागच्या पार्किंग लॉटमध्ये यायला सांगून फोन कट करतात. 

रात्रीची वेळ. सुनसान रस्ता. मार्टी तिथे आलाय. दूरवर पार्क केलेली काही वाहनं. मार्टीला तिथे डॉकचा आइन्स्टाइन कुत्रा दिसतो; पण डॉकचा पत्ता नाहीये. तेवढ्यात एक विचित्र आवाज करत समोरच्या ट्रकचा मागचा दरवाजा उघडतो आणि त्यातून डेलोरिअन कार बाहेर येते. कारमधून बाहेर उतरत डॉक ब्राउन मार्टीला उत्तेजित स्वरात आपलं स्वप्न साकारल्याचं सांगतात. कन्व्हर्ट केलेली ती कार म्हणजे टाइम मशीन असून प्लुटोनियममुळे त्यातल्या फ्लक्स कपॅसिटरला १.२१ गिगावॅट्स पॉवर मिळून त्यायोगे ती कार (टाइम मशीन) कुठल्याही काळात जाऊ शकते, असं सांगतात. आइनस्टाइनला त्यातून फिरवून आणून डेमोही देतात. त्या यंत्रासाठी लागणारं प्लुटोनियम डॉकनी ज्यांच्याकडून ढापलेलं असतं ते लिबियन बंडखोर तेवढ्यात तिथे पोहोचतात आणि गोळीबार करतात. त्या गोंधळात त्याच कारमध्ये बसून बचावासाठी पळणारा मार्टी मात्र कारच्या वेगामुळे मशीन अॅक्टिव्हेट झाल्याने, यंत्रात सेट केलेल्या तारखेनुसार तीस वर्षं मागे भूतकाळात १९५५च्या काळात त्याच शहरात जाऊन पोहोचतो... त्याच्याच आईवडिलांच्या तरुणपणाच्या काळात, जेव्हा ते एकमेकांच्या प्रेमातही पडणं अजून बाकी असतं! मार्टीला दिसतं, की त्या वेळीसुद्धा त्याच्या वडिलांचा तो धटिंगण मित्र बीफ त्यांना सतत छळत असतो आणि लॉरेनवर लाइन मारत असतो... दरम्यान, नव्यानेच शहरात उगवलेल्या या आधुनिक, स्मार्ट तरुणावर लॉरेन (त्याची भविष्यातली आईच!) लट्टू होते आणि सुरू होतो एक धमाल घोटाळा... तो भाग अत्यंत रंजक आणि मजेशीर.

आता मार्टीपुढे दोन अत्यंत गंभीर समस्या उभ्या ठाकतात. पहिली म्हणजे, कालपटलावर या विरोधाभासामुळे निर्माण झालेली गुंतागुंत मिटवण्यासाठी, कसंही करून आपल्या आईला आपल्या वडिलांच्या प्रेमात पाडणं भाग असतं अन्यथा त्याचं स्वतःचं अस्तित्वच कालपटलावरून पुसलं जाण्याचा धोका निर्माण होतो आणि दुसरी गंभीर समस्या म्हणजे प्लुटोनियमअभावी ती कार (टाइम मशीन) चालू करण्यासाठी फ्लक्स कपॅसिटरला लागणारी १.२१ गिगावॅट्स पॉवर कुठून तरी मिळवणे!...आणि त्यासाठी मार्टी तीस वर्षांपूर्वीच्या डॉक ब्राउनना शोधून काढतो, महत्प्रयासाअन्ती त्यांना पटतं, की मार्टी खरोखरच त्यांनीच भविष्यात विकसित केलेल्या टाइम मशीनमधून उलटा भूतकाळात आलाय आणि आता त्याला परत पाठवण्यासाठी डॉक्टर एक नामी शक्कल लढवतात ती म्हणजे आभाळातून जमिनीवर पडणाऱ्या विजेचा लोळ केबलद्वारे त्या फ्लक्स कपॅसिटरपर्यंत पोहोचवणे, ज्यामुळे त्या विजेच्या प्रचंड शक्तीमुळे हवी तेवढी ऊर्जा उत्पन्न होऊन मशीन सुरू होऊन मार्टी पुन्हा भविष्यकाळात जाऊ शकेल.

मार्टीने वडिलांना बीफच्या सततच्या त्रासाविरुद्ध लढायला मदत करणं, बीफशी त्याची मारामारी आणि स्केटबोर्डवरचा तो थरारक पाठलाग; आई-वडिलांना एकमेकांच्या प्रेमात पाडून, किस घ्यायला भाग पाडून सगळी घडी नीट बसवणं वगैरे हे सर्व घडताना बघणं अतिशयच उत्कंठापूर्ण!... बरं हे सर्व होऊन मार्टी एकदाचा पुन्हा १९८५च्या त्याच्या वर्तमानात परत येतो.

सकाळ झालीय. मार्टी उठलाय. घरात बघतो तर त्याच्या आई-वडिलांच्या, भावा-बहिणीच्या राहणीमानात, स्वभावात प्रचंड बदल झालाय. बीफचं वागणंही बदललंय. तो त्यांचा प्रचंड मवाळ नोकर झालाय आता. मार्टी बाहेर येतो. जेनिफर त्याला भेटायला आलीय. तिला तो मिठीत घेत असतानाच ‘धडाडधूम्म’ आवाज करत कुठूनतरी अचानक पुन्हा डॉकची कार (टाइम मशीन) अवतरते. आतून प्रचंड एक्साइट झालेले नवीनच अवतारातले डॉक बाहेर येतात. 

‘मार्टी तुला माझ्याबरोबर यावंच लागणारे’.
‘आता कशाला सांगताय बसायला? पुन्हा का जायचं त्या भूतकाळात?’ 
‘नाही नाही आता आपल्याला भविष्यकाळात जायचंय आणि जेनिफरपण हवीय बरोबर. कारण आपल्याला एक घोळ निस्तरायचाय, ज्याचा संबंध तुम्हा दोघांच्या भविष्यातल्या मुलांशी आहे...’ 

डॉक कार सुरू करतात. मार्टी, ‘पुढे रोड नाहीये’ सांगेपर्यंत या वेळी बदल झालेली ती भविष्यातली कार चक्क उडते... झाडांवरून तिघांना घेऊन, हवेत विरून दिसेनाशी होते....

इथे पहिला भाग संपतो आपल्याला पुढच्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता मनात निर्माण करत....

बॅक टू दी फ्युचर : भाग दुसरा - 

तिघांना घेऊन कार उडून हवेत विरून जाताना नेमकं तिथे आलेल्या म्हाताऱ्या बीफने पाहिलंय. 

आता तिघं त्यांच्या वर्तमानाच्या ३० वर्षं पुढे, २१ ऑक्टोबर २०१५मध्ये आलेत. डॉक जेनिफरला (एलिझाबेथ श्यू) गुंगी देऊन एका बोळात झोपवून ठेवतात. कारण तिला भविष्यातल्या या घटनांविषयी माहिती असू नये. बाहेर गेलेल्या मार्टीला बीफचा मुलगा ग्रिफ्फ (थॉमस विल्सन डबल रोल) दिसतो. बापासारखाच रागीट, चिडका, इतरांना त्रास देणारा. त्याला मार्टी ज्युनियरने (मार्टीचा भविष्यातला मुलगा) आपल्याबरोबर एका रॉबरीसाठी यायला हवंय. आपल्याच मुलाला सोडवण्यासाठी भविष्यकाळात आलेला मार्टी आपल्याच मुलाचं सोंग घेऊन त्याच्याशी पंगा घेतो आणि मग ग्रिफ्फ आपल्या गँगला घेऊन त्याच्या पाठलागावर. फरक इतकाच, की पूर्वी बीफबरोबरच्या १९५५मधल्या सुटकेसाठी मार्टीकडे स्केटबोर्ड होता, आता हॉवरबोर्ड आहे, जो जमिनीपासून काही इंच उंचावर तरंगत वेगाने पुढे उडत जातो. त्यावरून सुसाट पाठलाग; पण मार्टी त्यांना चकवा देतो. परिस्थिती आटोक्यात. ते दोघं जिथे जेनिफरला सोडलेलं असतं, तिथे येतात; पण बघतात की त्या गल्लीत पहाऱ्यावर आलेले २०१५चे पोलिस तिची ओळख पटवून तिला तिच्या घरी घेऊन जात असतात. आता तिला त्या भविष्यातल्या घरातून पळवून पुन्हा कारमध्ये घेऊन येणं भाग असतं. दरम्यान मार्टीने दुकानातून घेतलेलं एक अल्मनॅक, ज्यामध्ये २००० सालापर्यंतच्या सर्व रेसेसचे रिझल्ट्स छापलेले असतात, ते डॉक बघतात आणि त्याने असं करून त्या माहितीच्या आधारे रेसेस जिंकून काळाच्या घटनाक्रमात बदल घडवू नये असं सुचवतात आणि ते अल्मनॅक फेकून देतात. त्याचं हे बोलणं त्या २०१५मधला म्हातारा बीफ चोरून ऐकतो. त्याला डॉकच्या टाइम मशीनची कल्पना येते आणि त्या अल्मनॅकचं महत्त्वही कळतं. डॉक आणि मार्टी कारमधून उतरून जेनिफरला सोडवून आणण्याच्या मोहिमेवर निघतात, तेव्हा म्हातारा बीफ अल्मनॅक उचलून टाइम मशीनमध्ये शिरतो आणि नाहीसा होतो.

बीफ थेट भूतकाळात जाऊन १९५५च्या बीफला (आपल्याच तरुणपणीच्या रूपाला) भेटतो आणि ते अल्मनॅक त्याच्या हातात देऊन त्याचा वापर करायला सांगून पुन्हा २०१५मध्ये येऊन गुपचूप कारमधून बाहेर पडून लपतो. इकडे जेनिफरला सोडवून डॉक आणि मार्टी १९८५मध्ये परत येतात आणि त्यांना एक प्रचंड शॉक बसतो. त्यांना दिसतं, की १९८५मधली परिस्थती भलतीच वेगळी आहे. मार्टीच्या वडिलांचा खून झालाय आणि बीफ अचानक अनेक रेसेस जिंकून धनाढ्य झालाय. त्याने मार्टीच्या आईशी बळजबरीने लग्न केलंय. शहरात त्याचे मोठमोठे कॅसिनो उभे राहिलेत. हे सारं मार्टीच्या समजण्यापलीकडचं! तेव्हा डॉक समजवतात, की कालपटलात मागे शिरून बीफने केलेल्या गडबडीमुळे ते ज्या ठिकाणी आलेत ते मूळ १९८५नसून ‘ऑल्टरनेट रिअॅलिटी’ आहे... दुसराच १९८५ आहे आणि आत्ता त्यांना तो गोंधळ निस्तरून, दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा १९५५च्या त्या दिवसाच्या आधी जाऊन २०१५मधल्या बीफने १९५५च्या बीफला दिलेलं अल्मनॅक हस्तगत करून त्याला ते वापरण्यापासून प्रवृत्त करायला हवं आणि मार्टीच्या आई-वडिलांचं त्या कॉलेजच्या पार्टीत प्रेम जमून त्यांनी किस करायला हवं म्हणजे ती ऑल्टरनेट रिअॅलिटी नष्ट होऊन पुढचा १९८५चा भविष्यकाळ होता तसाच राहील. आणि मग सुरू होतो पुन्हा एक विलक्षण थरार....

आता २०१५च्या ‘ऑल्टरनेट रिअॅलिटी’मधून पुन्हा १९५५मध्ये आलेला मार्टी आई-वडिलांच्या कॉलेज पार्टीला, आपल्याच १९८५मधून १९५५मध्ये आलेल्या रूपाला स्टेजवर परफॉर्म करताना पाहतो. ते सारे सीन्स भलतेच धमाल...

बीफचा पाठलाग करून मार्टी अल्मनॅक परत मिळवतो; पण बीफ त्याचा बोगद्यात पाठलाग करतो. बोगदा संपत आलाय... आता कुठल्याही क्षणी बीफची कार स्केटबोर्डवरून पुढे जाणाऱ्या मार्टीला उडवणार, तोच... त्याच्या सुटकेसाठी आलेल्या डॉकने हवेतून उडणाऱ्या कारमधून सोडलेला दोरखंड मार्टी पकडतो आणि लटकून सुटका करून घेतो. आता वर कारमध्ये डॉक आणि दोरखंडाला लटकणारा मार्टी! आता दोघं पुन्हा १९८५मध्ये येणार, तेवढ्यात वादळ सुरू होतं. विजांचा कडकडाट. विजेचा लोळ येऊन कारवर आदळतो आणि दोरखंड तुटून मार्टी खाली कोसळतो... त्याच्या डोळ्यादेखत डॉक कारसकट नाहीसा होतो...

तिकडे वीज पडल्यामुळे बिघाड होऊन आतलं तारखेचं सेटिंग बदलतं आणि डॉक कारसकट ओढला जातो त्या १९५५च्या ७० वर्षं मागे १८८५मध्ये आणि दोरखंड तुटून खाली पडलेला मार्टी अडकून पडतो तिथेच १९५५मध्ये...

आता तो १९८५च्या वर्तमानात कसा परतणार? पावसात भिजत उभ्या असलेल्या मार्टीला काहीच सुचत नाहीये..अचानक त्या तसल्या तुफानी पावसात एक गाडी त्याच्या दिशेने येते आणि त्यातून उतरलेला एक कुरिअरवाला त्याच्या नावाचं कुरिअर त्या पावसात त्याच्या हातात ठेवतो... मार्टीला आश्चर्याचा मोठाच धक्का! पण निराश झालेल्या मार्टीला आतलं पत्र वाचून आता आनंदाचा धक्का बसतो... ते पत्र डॉकने पाठवलंय  आणि तारीख आहे १८८५ सालची.... म्हणजे डॉक १८८५मध्ये पोचलाय आणि जिवंत आहे??!!!...पण मग आता जायचं कसं त्या काळात?... मार्टीला आठवतं, की आपण १९५५च्या डॉकला पुन्हा गाठून त्याची मदत घ्यावी... मार्टी धावतच तिथून पुन्हा त्या क्लॉक टॉवरजवळ जातो, तर तिथे विजेच्या लोळातून मिळवलेल्या ऊर्जेतून चार्ज केलेल्या कारमधून मार्टीला १९८५मध्ये पाठवून, जेमतेम हुश्श करणारा डॉक उभा!! अचानक मार्टीला पुन्हा आपल्यासमोर दत्त म्हणून उभा ठाकलेला पाहून तो उडतोच!... ‘अर्रे तू? हे काय आत्ताच तर पाठवला ना मी तुला भविष्यात?’ ...धापा टाकत मार्टी म्हणतो, ‘मी तिथूनच आलोय परत! बॅक फ्रॉम द फ्युचर!’....आता पुढे?...... त्याचं उत्तर पुढच्या तिसऱ्या भागात...

बॅक टू दी फ्युचर : भाग तिसरा : 

नुकतंच ज्याला १९८५मध्ये पाठवून दिलं, त्याला १९५५मध्ये पुन्हा समोर दत्त म्हणून उभा ठाकलेला पाहून डॉक हैराण! हळूहळू त्यांना सर्व उलगडा होतो आणि १८८५मध्ये अडकलेल्या त्यांच्याच मूळ रूपाने पाठवलेल्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांनी १८८५ साली जिथे ती गाडी ठेवलेली असते ते ठिकाण शोधून, तिथून कार काढून आणि त्यांनीच पत्रात लिहिल्याबरहुकूम ती ते रिपेअर करतात. दरम्यान आणखी एक गोष्ट कळते, की १८८५मधल्या डॉकला त्यांनी ते पत्र पाठवल्यानंतर आठवडाभरातच बीफच्या पणजोबांनी ठार केलेलं असतं. म्हणजे आता मार्टीवर मोठीच जबाबदारी असते, ती म्हणजे १८८५ सालात जाऊन डॉकची मरणापासून सुटका करून त्यांना पुन्हा १९८५मध्ये घेऊन येणे! आणि सुरू होते मार्टीच्या १८८५मधल्या कॅलिफोर्नियातल्या त्या रेड इंडियन्स आणि काउबॉइजच्या जमान्यातली चित्तथरारक मोहीम!

रिपेअर केलेल्या कारमधून (टाइम मशीन) मार्टी दोन सप्टेंबर १८८५ रोजी अवतरतो तोच मुळी एका विस्तीर्ण पठारावर आणि समोर पाहतो तर एक रेड इंडियन्सची टोळी आपापली शस्त्रं परजत घोड्यांवरून त्याच्या दिशेने दौडत येतेय. मग मार्टीची पळापळ... सुसाट वेगाने कार पळवत तो पठारावरच्याच एका घळीत लपतो आणि कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटतो. आता त्याला त्या काळातल्या डॉकचा छडा लावायचाय.
फिरत फिरत तो १८८५मधल्या आपल्या मॅक्फ्लाय कुटुंबातल्या आजी-आजोबांना भेटलाय. आणि त्याची गाठ एका पबमध्ये, बीफच्या त्या कुप्रसिद्ध पणजोबांशी म्हणजेच ब्युफोर्ड ‘मॅड डॉग’ टॅननशी पडते. आणि त्यांच्यात बोलाचाली होते. ब्युफोर्ड गोळ्या झाडतो. मार्टी सटकू पाहतो; पण घोड्यावरून पाठलाग करत ब्युफोर्ड त्याला लास्सो टाकून पकडतो आणि फरफटत नेऊन फाशी देण्यासाठी उंच हूकवर लटकवतो...

तेवढ्यात गावचा ब्लॅकस्मिथ आपल्या लांबलचक नळीवाल्या बंदुकीने अचूक निशाणा साधून मार्टीच्या गळ्यातली दोरी तोडून मार्टीला सोडवतो. संतापलेला ब्युफोर्ड त्याला मारण्याची धमकी देऊन तिथून निघून जातो. मार्टीला दिसतं, की तो ब्लॅकस्मिथ म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून डॉकच असतात. ‘तुला सरळ १९८५मध्ये जायला सांगितलं होतं, तर इथे १८८५मध्ये का आलायस?’ असं डॉक विचारतात. मार्टी सगळी हकीकत सविस्तर सांगतो. आणि त्यांना आपल्याबरोबर १९८५मध्ये येण्यासाठी राजी करतो.

पार्टीमध्ये त्यांची गाठ पुन्हा ‘मॅड डॉग’ ब्युफोर्डशी पडते. मार्टी डॉकना त्याच्या गोळीपासून वाचवतो. चिडलेला ब्युफोर्ड त्याला द्वंद्वाचं आव्हान देतो. मार्टी शक्कल लढवून ते द्वंद्व कसं जिंकतो ते बघण्यासारखंच!

डॉकला हे माहीत आहे, की आता त्या टाइम मशीनला पुरेशी ऊर्जा हवी असेल, तर कार १४२ किलोमीटरच्या स्पीडने पळायला हवी आणि त्या काळात पेट्रोल कुठचं असायला?... मग डॉक एक आयडिया लढवतात, की कार रुळावर ठेवून रेल्वे इंजिनने तो वेग धारण करत कारला सुसाट ढकलत पुढे नेलं, की तो स्पीड मिळेल. 

हे सर्व घडत असताना डॉकच्या आयुष्यात एक स्कूलटीचर येते. तिचं नाव क्लारा क्लेटन (मेरी स्टीनबर्गन). ते सर्व जण मिळून रेल्वे इंजिनने कार ढकलण्याचा तो प्रयोग यशस्वी होत असताना गडबड होते आणि त्या गडबडीत डॉक आणि क्लारा १८८५मधेच राहतात आणि मार्टी १९८५मध्ये परत येतो तो थेट कॅलिफोर्नियामधल्या वर्तमानातल्या रेल्वे लाइनवर! समोरून धडधडत येणारी रेल्वे पाहून तो कसाबसा बाहेर उडी मारून जीव वाचवतो; पण सुसाट आलेली रेल्वे, कारचे (टाइम मशीन) तुकडे करून निघून जाते. 

पुढच्या दृश्यात मार्टी जेनिफरला त्या ठिकाणी आणून सर्व हकीकत सांगत असतानाच अचानक हवेतून डॉक एका अफलातून रेल्वे इंजिनसदृश टाइम मशीनमधून अवतीर्ण होतो. बरोबर कुटुंब आहे. कुत्रा आइनस्टाइन, पत्नी क्लारा आणि दोन मुलं ‘ज्यूल्स’ आणि ‘व्हर्न’!...

मार्टीला एक आठवण म्हणून दोघांच्या फोटोची तसबीर भेट देऊन डॉक आपल्या कुटुंबासह पुन्हा आकाशात दिसेनासा होतो... कुठल्या तरी काळाच्या प्रवासाला.... सिनेमा संपतो!

हे तीनही भाग म्हणजे एका अद्भुत, एकमेकांत गुंतलेल्या कथानकाची अफलातून पेशकश! त्यातले त्या त्या काळानुरूप असणारे सेट्स, सर्वांचे मेकअप, ड्रेसेस, त्या काळची भाषा, म्युझिक... सर्वच लाजवाब! आपल्याला खिळवून ठेवणारी ही त्रिसिनेधारा!!... 

ही फॅन्टसी केवळ ‘मस्ट सी’ अशीच!!    

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’मधील सर्व लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZTHBK
Similar Posts
कॅसाब्लांका अनेक विलक्षण गोड क्षणांनी भारून टाकणारं, रिक आणि इल्साच्या आगळ्या प्रेमाची कथा मांडणारं ‘कॅसाब्लांका’चं भूत एकदा मानगुटीवर बसलं की आयुष्यभर उतरत नाही... उपाय एकच असतो... निवांत सुट्टीचा दिवस गाठायचा आणि ‘कॅसाब्लांका’ची डीव्हीडी लावून त्यात हरवून जायचं... ‘सिनेसफर’मध्ये आज पाहू या त्याच सिनेमाविषयी..
अॅन अफेअर टू रिमेम्बर ‘अॅन अफेअर टू रिमेम्बर’ ही १९५७ सालची गाजलेली लव्ह स्टोरी. या सिनेमातल्या अनेक दृश्यांनी पुढे अनेक वर्षं अनेक सिनेमांना स्फूर्ती दिली. प्रवासातल्या एखाद्याशी अचानक होणारी भेट.... त्या ओळखीतून फुलणारी मैत्री.... त्या मैत्रीतून वाढणारा सहवास... आणि त्या सहवासातून जन्माला येणारं प्रेम!.... फार कमी लोकांच्या भाग्यात असे विलक्षण क्षण येतात
दी ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय ब्रह्मदेशावर जपानचा कब्जा असतानाची १९४३ सालची ही कथा. रंगून आणि बँकॉकमध्ये रेल्वेचं दळणवळण सुरू होण्यासाठी आता केवळ क्वाय नदीवरच्या रेल्वेब्रिजचं काम राहिलंय आणि ते करण्यासाठी तिथल्या क्रूर जॅपनीज कर्नल साईटोने ब्रिटिश युद्धकैद्यांना कामाला जुंपायची योजना आखली आहे. एक अमेरिकन नेव्ही कमांडर तो ब्रिज उडवायची कामगिरी शिरावर घेतो
प्रेमपत्र फार नाही, तीन चार दशकांपूर्वीपर्यंत (कम्प्युटर आणि मोबाइल अस्तित्वात येण्याआधीच्या काळात), प्रेमात पडलेले दोन जीव एकेमकांना हाताने लिहून प्रेमपत्र पाठवत असत. अशाच एका प्रेमपत्राने केलेल्या घोटाळ्यामुळे झालेले गैरसमज आणि त्याच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या एका हळुवार प्रेमाची कथा सांगणारा दिग्दर्शक बिमल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language